सामाजिक कार्यकर्ते उजागरे यांचे आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथे पार्किंग क्षेत्र नसलेल्या व्यावसायिक गाळेधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी केली. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी उजागरे, ललित कांबळे, प्रतिक आतकर, ऑगस्टीन पाखरे, आनंदराव आदी उपस्थित होते.
शहरातील कापड बाजार, शहाजी रोड, सारडा गल्ली, मोची गल्ली, जुना कापड बाजार, घास गल्ली येथील अतिक्रमणाबाबत शहरातील व्यापारी व काही संघटना यांनी उपोषण केल्यानंतर त्यांची दखल घेऊन मनपा अधिकारी व पोलिस प्रशासनाने सर्व गोरगरीब हॉकर्सना हाकलून लावले. परंतु सदर ठिकाणी बाजारात पाहणी करताना आयुक्त, महापौर, आमदार, पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांना व्यापार्यांनी त्यांच्या दुकानासमोर पार्किंगसाठी जागा नसल्याचे दिसून आले नाही. ही अतिशय खेदाची बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कापड बाजार येथील सर्व व्यावसायिक गाळेधारक यांचे पार्किंग क्षेत्र नसल्याबाबत तातडीने पार्किंग क्षेत्र नियमानुसार कारवाई हाती घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उजागरे यांनी दिला आहे.