चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
आरोपींना त्वरीत अटक करुन, पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय समाजातील 14 वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करुन पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गुरुवारी (दि.9 मार्च) चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सदर प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा केली. यावेळी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, शहराध्यक्ष विश्वनाथ निर्वाण, दशरथ सातपुते, वंदना गायकवाड, संगीता साळवे, महिला शहराध्यक्षा शशिकला झरेकर, महिला जिल्हाध्यक्षा मीना गायकवाड, आशा गायकवाड, पोपटराव बोरुडे, नंदकुमार गायकवाड, संतोष उदमले, योगेश सोनवणे, क्रांती गायकवाड आदी उपस्थित होते.
पाथर्डी मधील एका गावात मंगळवारी (दि.7 मार्च) धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी मागासवर्गीय अल्पवयीन बालिकेवर गावातीलच आरोपीने मित्राच्या मदतीने घराचा दरवाजा बंद करून बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे. आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती छळ प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक छळ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.


उसतोड मजुराच्या अल्पवयीन बालिकेवर गावातील आरोपी सुनील अशोक होडशीळ याने त्याचा आरोपी मित्र पप्पू मारुती केकाण या मित्राच्या मदतीने पाळत ठेवून, पिडीत बालिका तिच्या मैत्रिणी सोबत गावातील दुकानात रंग आणायला गेली असता तिला एकटीला गाठून आरोपी सुनील होडशील याने त्याच्या घरात उचलून नेले. त्यावेळी पिडीतेची मैत्रीण घाबरून पळून गेली. दुसरा आरोपी पप्पू केकाण याने घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला व आरोपी सुनील होडशील याने पिडीतेवर अमानुष पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली. पिडीतेने आरडाओरडा केल्याने आजबाजूचे लोक व पिडीतेची आजी घटना स्थळी आल्याने आरोपी पळून गेले. दुसर्या जिल्हयातील साखर कारखान्याला गेलेल्या पिडीतेच्या वडिलांना समजल्यानंतर ते बुधवारी गावी परतल्याने त्यांनी पाथर्डी पोलिसात आरोपी सुनील अशोक होडशीळ व पप्पू मारुती केकाण यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन्ही आरोपी फरार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर घटनेस दोन दिवस होऊन सुद्धा आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्वरित आरोपींना अटक करावी व पिडीत बालिकेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
