हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंडांवर तडीपाराची कारवाई करण्याची मागणी
कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय व हॉटेलमध्ये अनाधिकृत दारु विक्री सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पांढरीपूल (ता. नगर) परिसरात हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंड प्रवृत्तीच्या पालवे कुटुंबीयांवर तडीपाराची कारवाई करण्याच्या मागणीसाठी वांजोळी ग्रामपंचायत कार्यालय व भारतीय लोकशाही पार्टीच्या वतीने पांढरीपूलावर ठिय्या आंदोलन केले. संतप्त ग्रामस्थांनी यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीसांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना रस्त्यावरुन बाजूला केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
या आंदोलनात भारतीय लोकशाही पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब काळे, वांजोळी सोसायटी माजी चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, उद्योजक मच्छिंद्र पागिरे, नवनाथ पागिरे, काशिनाथ पागिरे, तंटामुक्ती गावचे अध्यक्ष आप्पासाहेब खंडागळे, मेजर तुकाराम डफळ, लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, राम कराळे, भगवान येळवंडे, उमाजी ससे, महेश काळे, वांजोळी सोसायटी चेअरमन विजयाताई काळे, लता खंडागळे, वांजोळी सरपंच सोनाली खंडागळे, खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

पांढरीपूल येथे संभाजी पालवे, भरत पालवे, राणा पालवे, जनताराम पालवे, विशाल पालवे आदी पालवे कुटुंबीय हॉटेल व कलाकेंद्र चालवित आहे. सदर हॉटेल व कलाकेंद्रामध्ये गुंडप्रवृत्तीचे लोक कामावर आहेत. कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय चालविला जातो. मागील महिन्यात सदर कलाकेंद्रावर अनाधिकृत सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र पुन्हा हा वेश्याव्यवसाय जोमाने सुरु झाला आहे. या कलाकेंद्रात येणार्या ग्रामस्थांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे, मोबाईल काढून त्यांच्यावर दादागिरी करण्यात येते. पालवे कुटुंबीय विनापरवाना हॉटेल चालवित असून त्यांच्याकडे अन्न-औषध प्रशासनाचा कोणताही कायदेशीर परवाना नाही. हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री देखील केली जाते. तसेच हॉटेलचे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. लवकरात लवकर सदरील अतिक्रमण काढून, नागरिकांना येण्या-जाण्यासाठीचा अडथळा दूर करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदरील गुंड प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठविणार्यांची पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नाही. मात्र त्यांच्या विरोधात गेलेल्या एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीवर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तर हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंड प्रवृत्तीच्या पालवे कुटुंबीयांवर तडीपाराची कारवाई करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला आहे.
ठिय्या आंदोलनात प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात गुंड प्रवृत्तींवर कारवाईची एकमुखी मागणी केली. या मागणीचे निवेदन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना देण्यात आले.
