• Fri. Jan 30th, 2026

पंचशील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

ByMirror

Feb 15, 2023

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी शाळा टिकतील -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम व अद्यावत शिक्षण व्यवस्थेतून भारत महासत्ता होणार आहे. मात्र शासनाची शिक्षण क्षेत्राबद्दल असलेल्या अनास्थेबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी खंत व्यक्त केली. तर प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी माध्यमांच्या शाळा टिकतील व सर्वासामान्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शहरातील पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सह्याद्री मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन संदीप थोरात, नगरसेविका शीलाताई चव्हाण, सुरेश तिवारी, अजय साळवे, माजी प्राचार्य डी. आर. जाधव, अनिल शेकटकर, डेव्हीड सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, सेक्रेटरी जयंत गायकवाड, उपाध्यक्ष रत्ना वाघमारे, विश्‍वस्त भिमराव पगारे, रवींद्र कांबळे, सारंग पाटेकर, सोमा शिंदे आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, ज्ञान मंदिर समाज घडविण्याचे कार्य करत आहेत. समाज घडविणार्‍या शिक्षण चळवळीत शासनाने वेगवेगळे धोरण राबविल्याने शैक्षणिक चळवळ अडचणीत आली आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षक नियुक्त केले जात नाही. लहान वयात खेळाची आवड निर्माण न करणार्‍या या धोरणामुळे भविष्यात ऑलम्पिक खेळाडू घडण्याचे स्वप्न पहाणे देखील अवघड बनले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थेची स्थापना झाली. बोर्डिंग व शाळेच्या माध्यमातून ही शाळा नावरुपास आली. काल. दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आजही संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबध्द आहे. शाळेत डिजिटल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाचे धडे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप थोरात यांनी सादर केलेल्या आई माझी या कवितेतून उपस्थित भारावले.


शाळेतील उपक्रमशील शिक्षक शेखर उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या भारुड, लावणीने उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याच्या कलाविष्काराला उपस्थित पालक व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गोसावी यांनी केले. आभार मुख्याध्यापक रमेश उकिर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती वांगणे, वंदना शिरसाठ, लुमाजी साबळे, सोनाली तिवारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *