निराधार मनोरुग्णांना माणुसकीच्या भावनेने अमृतवाहिनीचा आधार -अनिल वाबळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणार्या निराधार पिडीत मनोरुग्णांचा सांभाळ करुन उपचार व पुनर्वसनासाठी कार्य करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या कार्यासाठी नवीन चारचाकी वाहन प्रदान करण्यात आले. रावसाहेब पटवर्धन येथे वाहनाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्रियंका व जयंत गुलवाडी, विकास सांगळे, संचालक सुभाष कायगावकर, प्रा. अविनाश मुंडके यांच्या आर्थिक सहयोगातून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला वाहन देण्यात आले. अनिल वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्सचे संस्थापक बाळासाहेब ऊर्फ नाना भोरे, संजय शिंगवी, अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, सुधीर मुळे, डॉ. अविनाश मोरे, संस्थेच्या उपाध्यक्षा शारदा होशिंग, पटवर्धन स्मारकाचे विश्वस्त अॅड. रविंद्र शितोळे, निर्मला केदारी, सागर कायगावकर, विकास सांगळे, प्रा. अविनाश मुंडके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अमृतवाहिनी संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ प्रास्ताविकात म्हणाले की, निराधार मनोरुग्णांना समाजात तिरस्काराची वागणुक दिली जाते. ते रस्त्यावर फिरुन मिळेल ते खाऊन जीवन जगत असतात. त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना देखील घडतात. समाजाने नाकारलेल्या या निराधार पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा मानवसेवा प्रकल्प कार्य करीत असून, अनेक मनोरुग्णांना चांगले करुन त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल वाबळे म्हणाले की, समाजातील निराधार मनोरुग्णांना माणुसकीच्या भावनेने अमृतवाहिनी संस्थेचा आधार मिळत आहे. मनोरुग्ण असलेल्या अनेक निराधार महिलांवर बलात्कार होतात. त्याची कोणीही दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र या निराधार पिडीत मनोरुग्ण महिलांच्या न्याय, हक्कासाठी संस्था काम करीत आहे. निराधार मनोरुग्णांचे आयुष्य काळोखाने माखले असतांना त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करुन जगण्याची उमेद मानवसेवा प्रकल्प निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ऊर्फ नाना भोरे यांनी तरुणांनी सामाजिक कार्यात पुढे येण्याची गरज आहे. मनोरुग्ण समाजातील एक घटक असून, त्यांना बहिष्कृत न करता मदत करण्याची गरज आहे. अतिशय तळमळीने सुरू असलेल्या अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यासाठी आमचा नेहमी मदतीचा वाटा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात रस्त्यावर फिरणार्या निराधार पिडीत मनोरुग्णांना दाखल करण्यासाठी, दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तसेच मनोरुग्णांच्या वाहतुकीसाठी वाहनाची गरज पडत होती. मनोरुग्णांना संस्थेत घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण होत होती. मात्र या मिळालेल्या वाहनामुळे संस्थेचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. उपस्थित देणगादारांच्या हस्ते गाडीची चावी संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश राजगुरू यांनी केले. आभार अंबादास गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास गुंजाळ, सुरेखा केदार, कुणाल बर्डे, पूजा मुठे, अविनाश पिंपळे, रविंद्र मधे, शुभांगी माने, पल्लवी तुपे, श्रीकांत शिरसाठ, मच्छिंद्र दुधवडे, अनिल दुधवडे, प्रसाद माळी यांनी परिश्रम घेतले.