इतिहासाच्या कालपटावर अहिल्यादेवी होळकर यांनी कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- इतिहासाच्या कालपटावर पराक्रमी, योग्य शासनक, संघटक व न्यायप्रियतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान राहिले. तत्वज्ञानी राणी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. महिलांसाठी त्यांचे कार्य स्फुर्तीस्थान असल्याचे प्रतिपादन एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटी सदस्य अतुल फलके यांनी केले.

एकता फाऊंडेशन ट्रस्ट व भुसारे कोचिंग क्लासेसच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फलके बोलत होते. प्रारंभी अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. युवराज भुसारे, सतीश उधार, रंगनाथ शिंदे, घनश्याम कदम, निलेश भुसारे, जालिंदर जाधव, निलेश कापसे, सुषमा भुसारे, विजय भुसारे, दिनेश भुसारे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. युवराज भुसारे म्हणाले की, सध्या भारतासह इतर देशात महिलांना सेनेत स्थान देण्यात येत आहे, मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये पहिली स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करुन दिला. महिलांसाठी त्यांचे कार्य स्फुर्तीस्थान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.