• Thu. Mar 13th, 2025

नवीन मतदार निर्माण होणार्‍या विद्यापिठाच्या युवकांमध्ये जातीयवादाची बीजे पेरली जात आहे -प्रशांत जगताप

ByMirror

Nov 13, 2022

पुणे विद्यापीठ सीनेट सदस्य निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवनात बैठक

मतदान घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपची लोकसभा, विधानसभेवर भूक भागले नाही, तर त्यांनी विद्यापीठापासून ते रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकारण सुरू केले आहे. नवीन मतदार निर्माण होणार्‍या विद्यापिठाच्या युवकांमध्ये जातीयवादाची बीजे पेरली जात आहे. भाजपचे सिनेट सदस्य स्वत:च्या कंपन्या स्थापन करून व विद्यापिठाचे टेंडर घेऊन आपल्या विचारांच्या व्यक्तींच्या नेमणूका करत असल्याचा आरोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य निवणुक महाविकास आघाडी पॅनलचे प्रचार प्रमुख तथा पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सीनेट) सदस्य सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जगताप बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला नेत्या रूपाली ठोंबरे, युवकचे राज्य सरचिटणीस अब्दुल हाफीज, संध्यताई सोनावणे, सुषमाताई सातपुते, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. अनिकेत क्षीरसागर, अल्पसंख्यांक सेलचे साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रेश्मा आठरे, युवतीच्या अंजली आव्हाड, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, किसनराव लोटके, साधना बोरुडे, अनंत गारदे, भरत गारुडकर, मारुती पवार, अब्दुल खोकर, धीरज उकिर्डे, उमेश धोंडे, सिध्दार्थ आढाव, घनश्याम सानप, प्रा. भगवान काटे, अभिजीत सपकाळ, निलेश इंगळे आदींसह शहर राष्ट्रवादी व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.


पुढे प्रशांत जगताप म्हणाले की, एकट्या पुणे विद्यापीठचे वार्षिक बजेट 600 कोटी आहे. ते भाजपच्या ताब्यात जात असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या बजेटवर पोसली जात आहे. मधल्या पाच वर्षाच्या काळात विद्यापीठाच्या दोनशे कोटीच्या ठेव्या मोडण्यात आल्या. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यावरून व त्यांच्या पुतळ्यास विरोध करणार्‍यांच्या हातात विद्यापीठची सत्ता देणे चुकीचे ठरणार आहे. अहमदनगरचे विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात गेले असता, त्यांचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थीचे कुटुंबीय भाजपशी निगडीत आहे की नाही? हे पाहिले जाते. बहुजनांची मुले विद्यापीठात येऊ नये, यासाठी जाती-धर्माचे विचार परसविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले की, पुणे व जळगाव विद्यापीठ बारा ते पंधरा वर्षापासून भाजपच्या विचारसरणीचे केंद्र बनले आहे. या विद्यापिठावर त्यांनी कब्जा केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठाच्या जोरावर आपला कारभार करत आहे. शहरात एक हजार मतदार असून ही निर्णायक मते महाविकास आघाडीला मिळण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाण्यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, योग्य नियोजन केल्याने ही निवडणूक अवघड ठरणार नाही. मतदारापर्यंत पोचण्याचे काम प्रत्येक शहरातील पदाधिकारी करणार आहे. विद्यापीठाची निवडणूक गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. विद्यापीठ ही शिक्षण प्रणाली म्हणून विचार करावे लागणार आहे. राजकारण ठरवणारे ते विद्यापीठ होऊ नये. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार प्रसार करून मतदार जागृतीचे कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या निवडणुकीच्या भेटीचा समारोप नगर शहरात होत आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून, मतदारांची गाठीभेटी घेऊन पदाधिकार्‍यांना मतदानाची जबाबदारी सोपविण्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी केले. आभार अल्पसंख्यांक सेलचे साहेबान जहागीरदार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *