विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते ठराव मंजूर
नेप्ती उपबाजार समितीत असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड, स्टेशन रोड येथील दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात अशोक लाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.
सचिव मोहन गायकवाड यांनी यावेळी सभासद हिताचे विविध विषय मांडले. मागील विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करुन कायम करण्यात आले. वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, उत्पन्न खर्च-पत्रक वाचून त्याला मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष सुनिल विधाते, ज्येष्ठ माजी संचालक नंदकिशोर शिखरे, महेंद्र लोढा व संतोष सूर्यवंशी यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी नितीन भोर, कल्याण वाळके, बाळासाहेब आंधळे, दिलीप ठोकळ, सुशील बजाज, पंकज कर्डिले, अशोक निमसे, गणेश लालबागे, संतोष गोंधळे, दिलीप मिस्किन, बाळासाहेब विधाते, नंदकुमार बोरुडे आदी उपस्थित होते.
असोसिएशनच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी व सर्वांगीण विकासासाठी 2021-2026 च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ सदस्यांनी विशेष पुढाकार घेत भाजीपाला विभाग मार्केटयार्ड व नेप्ती उपबाजार समिती कांदा मार्केट येथील अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नेप्ती उपबाजार समिती कांदा मार्केट येथे असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने सदर कार्यालयीन वापरासाठी जागा मिळण्याची मागणी करण्यात आली. या विषयावर कार्यकारी मंडळ सदस्य निखिल वारे यांनी लवकरच कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर संबंधित कार्यालय व पदाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून व पाठपुरावा करून कांदा मार्केट नेप्ती उपबाजार समिती येथील सभासदांसाठी लवकरच कार्यालय उपलब्ध करून घेण्याचा ठराव मांडला. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली.