दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने सप्तरंगांची उधळण करीत रांगोळ्यांनी विविध कलाकृती रेखाटल्या. अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण अंतर्गत (रिमांड होम केंद्र स्तर) रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रामध्ये विविध शाळांमध्ये शिकत असणारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
केंद्रातील विशेष शिक्षक उमेश शिंदे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदेश शिंदे, समन्वयक महेश शिरसागर, भाऊसाहेब आढाव, प्रभाकर थोरात, मेघा पवार, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत रांगोळीची पकड, आकार, रंग संगती, रंग भरण आदी विषयी प्रत्यक्ष कृती अनुभवून कार्यशाळेचा आनंद लुटला. या कार्यशाळेसाठी उद्धव अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक ललित फंड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्कार भारती रांगोळी या कार्यशाळेचे वैशिष्टये ठरले.
विशेष शिक्षक उमेश शिंदे म्हणाले की, गेली दहा वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील असून, या कार्यशाळेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भावनिक विकास, संवेदना, एकाग्रता, हस्त, नेत्र कौशल्याचा विकास होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदेश शिंदे म्हणाले की, या कार्यशाळेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. तर त्यांच्या मनातील निरागस सप्तरंगाची उधळण आज या मुलांना करायची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर थोरात यांनी केले. आभार मेघा पवार यांनी मानले.