वसतिगृहातील विद्यार्थीनींची छेड काढत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बांधकाम व्यावसायिक खानचंदाणी विरोधात मुलींचे वसतिगृह चालविणार्या किरण सचिन गारदे या महिलेने थेट विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. महिलेने खानचंदाणी यांच्यावर गुन्हा दाखल असताना, त्यांनी पुन्हा दमदाटी करुन त्रास देण्यास सुरुवात केली असून, वसतिगृहाच्या मुलींची देखील ते छेड काढत असल्याचा आरोप केला आहे.
नुकतेच विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता, त्यांना महिलेचे सासरे अनंत गारदे यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.
शहरातील चित्रा टॉकीज येथे किरण गारदे या मुलींचे वसतिगृह व मेस चालवीत आहे. त्यांच्या शेजारी खानचंदाणी यांनी बांधकाम सुरु केले आहे. 2 मार्च रोजी कामगार भिंत पाडत असताना वसतिगृहाच्या मुलींच्या अंगावर विटा व दगड पडू लागल्याने त्यांनी ते काम थांबविले. सदर महिलेने खानचंदाणी बंधूंना सासू आजारी असल्याने सासरे त्यांना घेऊन पुण्याला गेले असल्याचे सांगितले.
मात्र खानचंदाणी यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याने झालेल्या वाद प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला विष्णू खानचंदाणी, चतुर्भुज खानचंदाणी व सनी खानचंदाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र पुन्हा सदर आरोपींनी दुसर्या दिवशी (दि.3 मार्च) दमदाटी करण्यास सुरुवात केली व विद्यार्थीनींची छेडछाड सुरु केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. खानचंदाणी मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांच्यापासून कुटुंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून, पोलीस प्रशासनाला सदर बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी किरण गारदे यांनी विरोधीपक्ष नेते पवार यांच्याकडे केली आहे.
