• Thu. Jan 16th, 2025

तालुका उपनिबंधकाच्या विरोधात सैनिक समाज पार्टीचे उपोषण

ByMirror

Aug 16, 2022

अवैध सावकारीला पाठीशी घालून कर्जदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध सावकारीला पाठीशी घालणार्‍या तालुका उपनिबंधकाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, शहराध्यक्ष विलास शिंदे, जिल्हा संघटक राम कराळे, दत्ता वामन, आशा गायकवाड, प्रिया गायकवाड आदी सहभागी झाले होते.


पतसंस्था व खासगी सावकार यांना नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाने आर्थिक तडजोड करून, कर्जदार पिडीतांची मानसिक पिळवणुक चालवली आहे. तर 101 चे बोगस दाखले वाटप करुन कर्जदारांना त्रास देऊन जबरदस्तीने मोठ-मोठ्या रकमा उकळण्याचा सापटा लावला असलाचा आरोप सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


हा प्रकार साखळी पध्दतीने सुरु आहे. अहमदनगर फेडरेशन बेकायदेशीरपणे राजमुद्रेचा गैरवापर करुन अव्वाच्या सव्वा रक्कम मिळवून बोगस दाखल्याद्वारे उकळत आहे. अनेक पतसंस्थांनी शासनाचे कोणतेही निकष न पाळता कर्जदाराकडून कोरे चेक घेऊन त्यांना लुटण्याचा प्रकार सुरु केला आहे. याकडे तालुका उपनिबंधक दुर्लक्ष करीत आहे. तसेच सावकारी प्रतिबंधक कायदा 2014 अन्वये प्रकरणे कार्यालयात आलेली असताना सावकारांशी संगनमत करुन तक्रारदारांना धमकावून तक्रारी मागे घेण्यायासाठी समज दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या सर्व प्रकरणाला जबाबदार असणारे तालुका उपनिबंधकांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीने केली आहे. सैनिक समाज पार्टीने सावकारीला पाठबळ देण्याप्रकरणी काही पतसंस्था व तालुका उपनिबंधकाविरोधात केलेल्या तक्रारीवर 12 ऑगस्टला सुनावणी घेऊन तक्रारीतील मुद्दयांना अनुसरुन संबंधितांना सुचना केल्याचे लेखी पत्र सहनिबंधक गौतम देवळालीकर यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *