वांबोरीच्या वाडी-वस्तींवर तिरंगा ध्वज वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- वांबोरी (ता. नगर) येथील डोंबारी वस्तीमधील पालांवर तिरंगा फडकला. गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान, अहमदनगर पोलीस दल, लायन्स क्लब संचलित घर घर लंगर सेवा व पोलीस मित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वांबोरी गावातील वाडी-वस्तीवर जाऊन तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आले.

गावातील शालेय विद्यार्थी व डोंबारी वस्तीमधील मुलांना तिरंगा ध्वज देऊन खाऊचे वाटप करण्यात आले. हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणार्या नागरिकांनी मोठ्या अभिमानाने आपल्या पालावर तिरंग फडकवला.

शहरात हर घर तिरंगा दिसत असताना, या ग्रामीण भागात देखील घरापासून ते झोपडी पर्यंत तिरंगा फडकत आहे. या अभियानात घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, कैलाश नवलाणी, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, पोलीस मित्र संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष आशुतोष नवले, अमित इधाते, मनिष पानसे, संभव काथेड, ऋषीकेश पागीरे, डोंबारी समाजाचे अध्यक्ष वाघ, रवी जाधव आदी सहभागी झाले होते.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, देशातील प्रत्येक गरीब-श्रीमंत व्यक्ती स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. दुर्बलघटकांना या उत्सवात सहभागी करुन घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोंबारी वस्तीतूनही भारत माता की जय… घोषणांचा आवाज निनादला.
