उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड चौकात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील जागे संदर्भात महानगरपालिकेच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाचा निकाल समजताच बहुजन समाज पार्टीच्या वतीने बुधवारी (दि.22 सप्टेंबर) ढोलीबाजाच्या निनादात आंबेडकरी जनतेला पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

मार्केटयार्ड चौकात झालेल्या जल्लोषाप्रसंगी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हा महासचिव राजू शिंदे, मयूर भिंगारदिवे, बंडू पाटोळे, मनोज साठे, शहर कोषाध्यक्ष दीपक पवार, शहर महासचिव अतुल जाधव, शहर सचिव नंदू भिंगारदिवे, पै. सागर शिंदे, संजय कांबळे, अशोक भोसले आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष जाधव म्हणाले की, आंबेडकरी जनतेचे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी सर्वच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्वरीत महापालिका प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
