• Thu. Oct 16th, 2025

जय हिंद फाऊंडेशनच्या वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ

ByMirror

Jul 24, 2023

उजाड डोंगररांगा व माळरान हिरावाईने फुलविण्यासाठी सातत्याने होत आहे वृक्षरोपण व संवर्धन

माजी सैनिकांचा देश सेवेनंतर वृक्ष सेवेचा ध्यास मानवतेच्या कल्याणासाठी -पुरुषोत्तम आठरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उजाड डोंगररांगा व माळरान हिरावाईने फुलविण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून सातत्याने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ करण्यात आले. दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते, त्याचा प्रारंभ शिरापूर करडवाडी (ता. पाथर्डी) येथून करण्यात आला.


शिरापूर करडवाडी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या आवारात 51 वडाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण गोशाळेचे ह.भ.प. दिपक काळे महाराज, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, उद्योजक धीरज मैड, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, गणेश बुधवंत, अमोल लवांडे आदी उपस्थित होते.


पुरुषोत्तम आठरे म्हणाले की, जिल्ह्यात जय हिंदने वृक्षरोपण व संवर्धन चळवळीला चालना दिली आहे. फक्त झाडे न लावता ते जगविण्याच्या उद्देशाने कार्य केले जात आहे. त्यांच्या कार्याने जिल्ह्यातील अनेक डोंगर रांगा हिरवाईने फुलत आहे. माजी सैनिकांच्या माध्यमातून देश सेवेनंतर वृक्ष सेवेचा ध्यास मानवतेच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील परदेशी यांनी माजी सैनिकांच्या पर्यावरण प्रेमाला सलाम करुन सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. धीरज मैड यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून, या अभियानात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.


शिवाजी पालवे म्हणाले की, माजी सैनिक हा ध्यास घेऊन पर्यावरण संवर्धनाचे कार्य करत आहे. जिल्ह्यातील सर्व डोंगररांगा व उजाड माळरान हिरवाईने फुलविण्याचा जय हिंदचा संकल्प आहे. या उद्देशाने कार्य सुरु असून, अनेकांचे हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ह.भ.प. दिपक काळे महाराज यांनी जय हिंदच्या माध्यमातून गो शाळेचा परिसर हिरवाईने नटणार असून, त्याचा लाभ उन्हाळ्यात सावलीसाठी जनावरांना होणार असल्याचे स्पष्ट केले. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *