हातात तिरंगे ध्वज घेऊन महिला व युवतींची रॅली
स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदानाचा विसर भारतीयांनी पडू देऊ नये -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याची सुवर्णपहाट उगविताना देशाच्या फाळणीची काळरात्र देखील इतिहासात कोरली गेली आहे. भारत-पाकिस्तान रक्तरंजित फाळणी डोळ्यापुढे उभे करुन अंगावर शहारे आणणारा माहिती व छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नालेगाव येथील जनशिक्षण संस्थेत करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते फाळणीच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी जनशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी युवती व महिलांना परिसरातून हर घर तिरंगा जनजागृतीसाठी रॅली काढली. हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीचे समारोप करुन संस्थेच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी व्याख्याते प्रा. शरद पवार, राष्ट्रवादी उद्योग, व्यापार सेलचे शहराध्यक्ष अनंत गारदे, ज्येष्ठ नागरिक वसंत शिंदे, राष्ट्रीय खेळाडू विशाखा भास्कर, अमोल भास्कर, व्यवस्थापकिय कमिटी सदस्य विजय इंगळे, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, मनिषा शिंदे, उषा देठे, विजय बर्वे, लहू कराळे, अनिकेत येमुल, प्रशिक्षिका मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, ममता गड्डम, रेणुका कोटा, नंदेश शिंदे आदींसह युवती व महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात शफाकत सय्यद यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षण देत असताना, जनशिक्षण संस्थेत विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रीय सण-उत्सव देखील साजरे केले जात असल्याचे स्पष्ट केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाईंटचे पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, देशातील भाग्यवान नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार होता येत आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांचे बलिदान आहे. स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदानाचा विसर भारतीयांनी पडू देऊ नये. भारत-पाकिस्तानची फाळणी एक अमानुष घटना होती. ज्यामध्ये अनेक नागरिक मारले गेले. कोरोना महामारीत गावाकडे पायी जाणारे परप्रांतीयांचे दृश्य पाहून याच फाळणीची आठवण झाली होती. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना फाळणीचे मोठे परिणाम देशावर झाले. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडून देशाने विकास साधून जगासमोर आपला बलशाली भारत उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. शरद पवार म्हणाले की, आर्थिक, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत अडकलेल्या भारतीय नागरिकांनी 1857 ला उठाव केला. या लढ्यात हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचा धसका ब्रिटिशांनी घेतला. त्यानंतर ब्रिटिशांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दुफळी निर्माण करुन झोडा, फोडा व राज्य करण्याची रणनिती अमलात आनली. बंगालच्या फाळणीत पाकिस्तान फाळणीचे बीजे रोवली गेली. फाळणीत रेल्वेभरुन मृतदेह आले व गेले. इतिहासात सगळ्यात वाईट पध्दतीने ही फाळणी झाली. मोठ-मोठे जमीनदार श्रीमंत रस्त्यावर आले. कुतुबशाही, मुघल व त्यानंतर ब्रिटिश अशा पध्दतीने भारतीय आठशे वर्ष गुलामगिरीत होते. मोठ्या संघर्ष व बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार अनिल तांदळे यांनी मानले.
