दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव मंजूरीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या रस्त्याचे काम रद्द झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनानिमित्त श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालय समोर निपाणी वडगावचे ग्रामस्थांसह भागचंद नवगिरे यांनी आमरण उपोषण केले. ग्रामविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक व एका गाव गुंडाच्या सांगण्यावरुन आठ महिने बदली प्रस्ताव दाबून ठेवला असल्याचा आरोप करुन दप्तर दिरंगाई कायद्यातंर्गत संबंधित ग्रामविकास अधिकारीवर कारवाई करण्याची मागणी केली.
या उपोषणात जिल्हा परिषद सदस्य मंगल अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊत, मानव हित लोकशाही पार्टीचेकार्याध्यक्ष विजय शेलार, श्रीरामपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील साबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकता समितीचे उपाध्यक्ष दिपक भांड, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब कापसे, लहुजी सेनेचे तालुकाध्यक्ष सागर भोडगे, निपाणी वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नानासाहेब मांजरे, अंकुश धोंडीराम शिरसाठ, रोहन नवगिरे, विशाल म्हस्के, किरण खंडागळे, गणेश उमाप आदी उपोषणात सहभागी झाले होते.
निपाणी वडगाव येथील दलित वस्ती योजनेतील जुनी मराठी शाळा येथील रस्ता ग्राम विकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक एका गाव गुंडाच्या सांगण्यानुसार आठ महिने बदली प्रस्ताव आपल्या कार्यालयात दाबून ठेवला होता. वारंवार विनंत्या करून व मागणी करून देखील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला नाही. शेवटी वर्ष अखेरीस प्रस्ताव कार्यालयात सादर केला. त्यामुळे सदरील प्रस्ताव रद्द झाला. या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला असल्याचे नवगिरे यांनी निवेदनात म्हंटले आहे. संबंधीत ग्रामविकास अधिकारी गावातील गावगुंड यांच्या मदतीने व ठेकेदाराची आर्थिक देवाण-घेवाण करून मनमानी कारभार चालवत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. आयकर विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यामार्फत ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी व्हावी, दप्तर दिरंगाई कायद्यानूसर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते नवगिरे यांनी केली आहे.