परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अॅमिनिटी जागेत खोदली अनाधिकृत चर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात नव्याने झालेल्या कॉलनीत ड्रेनेजलाईन नसल्याने काही कुटुंबीयांनी ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट उघड्यावर सोडून दिल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कॉलनीतील अॅमिनिटी जागेत मोठी चर खोदून ऐन पावसाळ्यात हे घाण पाणी सोडले गेल्याने साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गाझी नगर येथील सदरच्या कॉलनीत ड्रेनेजलाईनची सुविधा नसल्याने प्रत्येक कुटुंबीयांनी सेप्टीक टँकची व्यवस्था केलेली आहे. मात्र काही कुटुंबीयांनी एकत्र येऊन दररोजचे सांडपाणी व मैलामिश्रीत घाण पाणी सोडण्यासाठी या परिसरातील अॅम्युनिटी जागेत चर खोदली आहे.

उघड्यावर ही चर खोदण्यात आली असून, त्याद्वारे इतरांच्या खासगी जागेत हे घाण पाणी जात आहे. या भागातील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी महिनोमहिने साचत असते. त्या पाण्यातच हे मैलामिश्रीत पाणी जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, अस्वच्छता पसरली आहे. या घाण पाणीद्वारे डासांची पैदास होऊन रोगराई वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्वरीत महापालिका प्रशासनाने या भागाची पहाणी करुन खोदण्यात आलेली अनाधिकृत चर बुजवून सदर भागात जमणार्या पाण्याचा बंदोबस्त करुन नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.