जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयावर मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोड (ता. नगर) येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन व्ही.आर.डी.ई. येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा उत्साहात पार पडली. मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेला जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयीन शिक्षक व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अहमदनगर महाविदयालयाचे उपपाचार्य डॉ. प्रितमकुमार बेदरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून जवाहर नवोदय विद्यालय टाकली ढोकेश्वरचे प्राचार्य एस. पी. बोरसे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे डॉ. रामेश्वर लोटके, केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे प्राचार्य राकेश कुमार, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 चे प्राचार्य सुरेश यादव, केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 चे प्राचार्य सम्राट कोहली उपस्थित होते.
2023 या वर्षासाठी भारताला जी 20 चे अध्यक्षपद देण्यात आले असून, त्यासंबंधित देशांच्या परिषदा भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी आणि सर्वसामन्या पर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जनसहभाग अभियानातंर्गत ही कार्यशाळा दोन सत्रामध्ये पार पडली.
सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना प्राचार्य एस. पी. बोरसे म्हणाले की, विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देऊन आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी जी 20 परिषदेचा उपक्रम असल्याचे स्पष्ट करुन जी 20 ची विस्तृत माहिती दिली. डॉ. रामेश्वर लोटके यानी मूलभूत साक्षरता आणि संख्या शास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात मार्गदर्शन करताना प्राचार्य सम्राट कोहली यांनी स्पर्धामय युगात डिजीटलचे महत्त्व व शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे डिजिटल माध्यम या विषयाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रितमकुमार बेदरकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण ची व्याप्ती व आव्हाने यावर आपले मत मांडले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन पियूषा मुळे व प्रीती राय यांनी केले. आभार वृषाली कोचेवाड यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
