संग्रहालयास ख्रिस्तायन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ प्रदान
डॉ. संतोष यादव कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- आदर्श समाज निर्मितीसाठी इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे. आपल्या वैभवशाली ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शरद कोलते यांनी केले.
अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. मधुसूदन कुलकर्णी उद्यान मुर्तीचे लोकार्पण सोहळा व संग्रहालयास ख्रिस्तायन या दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ प्रदान सोहळ्याप्रसंगी डॉ. कोलते बोलत होते. मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी उद्योजक रमेश फिरोदिया, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. दीपक अग्रवाल, भूषण देशमुख, रावसाहेब नवले, डॉ. संतोष यादव, गौरव मिरीकर, प्रमोद आहेर, सचिन धांडे, राहुल भोर, नारायण आव्हाड, गणेश रणसिंग, रामदास ससे, नवनीत धाडक, प्रा. डॉ. शंकर थोपटे, आनंद कल्याण, बापू मोढवे आदींसह इतिहास प्रेमी व महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

पुढे डॉ. कोलते म्हणाले की, शासनाकडून अनुदान न घेता वस्तुसंग्रहालयाचे मोठे कार्य उभे राहिले आहे. या कार्याला अधिक वैभवता प्राप्त करण्यासाठी व हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. इतिहासामध्ये मोडी लिपीला मोठे स्थान असून, अनेक ऐतिहासिक ठेवा मोडीमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून शालेयस्तरावर छोटे-छोटे अभ्यासक्रम सुरु केल्यास शहराचा ऐतिहासिक वारसा नवीन पिढीला कळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यात मोडी लिपी अधिक सहज व सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजण्यासाठी लिहिले गेलेले मोडी किरण पुस्तकाचे निर्माते डॉ. संतोष यादव यांना या वर्षीचा कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्काराने उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. 99 वर्षीय कुसुमबाई धाडक यांनी 7 वर्षाच्या परिश्रमाने लिहिलेला ख्रिस्तायन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास प्रदान करण्यात आला. उद्योजक रमेश फिरोदिया यांनी वस्तुसंग्रहालयासाठी दरमहा पाच हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.
प्रास्ताविकात रवींद्र साताळकर म्हणाले की, उद्यानाने ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाची शोभा वाढली आहे. संग्रहालयात ऐतिहासिक वास्तू आधुनिक पद्धतीने मांडले असून त्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहे. शासनाचा वस्तू संग्रहालयासाठी कोणताही निधी नाही, मात्र समाजाची साथ मिळत असल्याने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर वस्तुसंग्रहालयाची स्थापनेपासूनची आज पर्यंतच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संतोष यादव म्हणाले की, वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून मोडी लिपीचे काम समाजासमोर आणता आले. महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे भव्य वस्तू संग्रहालय अहमदनगर शहरात आहे. शासनाचा निधी नसला, तरी हा वैभवमय वारसा सामाजिक योगदानाने पुढे चालवला जात असून, यासाठी अनेकांचे हातभार लागत आहे. नगरमध्ये फिरायला कुठे जावे? हा प्रश्न असताना शहराचा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी वस्तुसंग्रहालय उत्तम ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले. संग्रहालय पुणे विद्यापीठ केंद्राला जोडून संशोधन केंद्र सुरू करण्यात आले असून, ख्रिस्तायन या दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ प्रिंट व डिजिटीलायझेशन मध्ये सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्ता टिळक यांनी आपले पंजोबा रेव्ह. ना.वा. टिळक यांचा इतिहास अहमदनगरच्या मातीशी जोडला गेलेला असल्याचे सांगून त्यांच्या कौटुंबिक इतिहासाला उजाळा दिला. ख्रिस्तायन हा दुर्मिळ ग्रंथ मुद्रित स्वरुपात नसल्याने हा हस्तलिखित ठेव्याचे चांगल्या पध्दतीने जतन होण्यासाठी वस्तु संग्रहालयाला देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ग्रंथाच्या माध्यमातून धाडक व टिळक परिवार जोडले गेला आहे. हा ग्रंथ पोथीप्रमाणे न राहता, त्याचे पारायण होण्याची गरज आहे. ख्रिस्ती धर्म पाश्चात्य असला तरी भारतामध्ये उपासना पद्धती भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार भूषण देशमुख यांनी मानले.
