लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी दररोज पाणी देण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याअभावी करपत चाललेल्या झाडांना वाचविण्यासाठी निमगाव वाघा (ता.नगर) येथील वृक्षमित्र पै. नाना डोंगरे धावून आले असून, गावातील नवनाथ विद्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या पाचशेपेक्षा जास्त झाडांना दररोज पाणी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरु आहे.
नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावाच्या परिसरात दर पावसाळ्यात झाडे लावण्यात येतात. झाडे लावण्याबरोबर त्याचे संवर्धनाची जबाबदारी देखील संस्थेने घेतली आहे. विद्यालयाच्या परिसरात तब्बल सातशे ते आठशे झाडे लावण्यात आली आहे. यापैकी अनेक झाडे मोठी व विस्तीर्ण झाली असून, काही झाडे पाण्या अभावी करपत चालली असताना डोंगरे यांनी पुढाकार घेऊन त्यांना पाणी देण्याचे काम नित्यनियमाने सुरु आहे. या कामासाठी त्यांना मुख्याध्यापक किसन वाबळे व लहानबा जाधव सहकार्य करतात. मागच्या दुष्काळातही या झाडांना डोंगरे यांनी स्वखर्चाने टँकरने पाणी देऊन वाचवली होती. फक्त वृक्षरोपण पुरते मर्यादित न राहता वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेऊन त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.