निशुल्क योग अभ्यास वर्ग घेताना योग प्रशिक्षक घडविण्याचेही कार्य सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष मंत्रालय भारत सरकार मार्फत योगा प्रशिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या वाय.सी.बी. वर्ग-2 परीक्षेचा आनंद योग केंद्राचा निकाल शंभर टक्के लागला. अत्यंत अवघड असलेल्या या परीक्षेत योग केंद्रात सराव करणार्या अंजली गांधी, सोनाली जाधव, नेहा कटारिया, सारिका मोरे, भाग्यश्री दातखिळे, इशा देशपांडे, सुवर्णा कांबळे, ऐश्वर्या लोढा, चंद्रशेखर सप्तर्षी, राजू रिकुल, दीपक वाघ यांनी यश संपादन केले.
सध्या जगभरात सदृढ आरोग्यासाठी योगाचे महत्त्व वाढू लागले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी योग प्रशिक्षक म्हणून काम पाहू शकतात. योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर या पदवीला जागतिक मान्यता आहे. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना आनंद योग केंद्राचे प्रमुख दिलीप कटारिया, आशीर्वाद साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.
कोरोना महामारीनंतर समाजाला आरोग्याचे महत्त्व पटले असून, युवा व महिला वर्ग योग अभ्यासाकडे वळत आहे. मात्र मोठ्या संख्येने लोक कंटाळा व आळस करुन योग करीत नाही. निरोगी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा असून, भारताने संपुर्ण जगाला निरोगी जीवनासाठी योग अभ्यासाची संजीवनी दिली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी योगाचा प्रचार-प्रसार करणार असल्याचे दिलीप कटारिया यांनी सांगितले. आनंद योग केंद्राचा वतीने सावेडी भागात अनेक निशुल्क योगाचे वर्ग घेतले जातात. योगाचा प्रचार-प्रसार होऊन नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे, या मागचा प्रमुख हेतू आहे. गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. योग अभ्यासाचे धडे देताना योग प्रशिक्षक घडविण्याचे कार्य देखील केंद्राच्या माध्यमातून चालत आहे. लवकरच वाय.सी.बी. वर्ग-2 व वर्ग-3 च्या परीक्षेसाठी 22 एप्रिल पासून योग साधकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर घेतले जाणार असल्याची माहिती आनंद योग केंद्राच्या वतीने देण्यात आली.