उत्तम आरोग्यासाठी तेलविरहीत, पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपीचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडत असताना, महिलांसाठी खाद्य तेलाचे वापर न करता उत्तम आरोग्यासाठी सावेडी येथील आनंद योग केंद्रातर्फे पाककला कार्यशाळा घेण्यात आली. महिला दिनाचे औचित्यसाधून घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
शुभ मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेमध्ये वंदना पवार यांनी तेलाचा एक थेंबही न वापरता खाद्य पदार्थांचे विविध रेसिपी प्रात्यक्षिकांसह बनवून दाखविल्या. दररोज सकाळी उठल्यपासून ते रात्री जेवणा पर्यंत अनेक खाद्य पदार्थामध्ये तेलचा वापर करुन ते आहार घेतले जातात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, कमी तेलाचे खाद्य पदार्थ घेऊन ह्रद्यरोग व इतर आजार टाळण्याचा सल्ला त्यांनी गृहिणींना दिला. रुपाली रिक्कल यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरबत प्रीमिक्सचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच यावेळी उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक व सकस आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
आनंदयोग केंद्राच्या संचालिका अलका कटारिया यांनी पाककला कार्यशाळेच्या मार्गदर्शिका पवार व रिक्कल यांचा सत्कार केला. सुनिता गुळवे यांनी महिलांना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी योग प्राणायामाचे महत्त्व सांगितले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रतीक्षा गीते, स्वाती वाळुंजकर, वैशाली कटारिया यांनी परिश्रम घेतले.