• Mon. Jan 13th, 2025

अपंगाचे बनावट प्रमाणपत्र वापरणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करा

ByMirror

Feb 21, 2022

सावली दिव्यांग संघटनेचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्राने दिव्यांगांचे लाभ घेऊन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चार बनावट दिव्यांगांवर गुन्हा दाखल झालेला असताना यामधील आरोपी मागील दीड महिन्यापासून मोकाट आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केली आहे.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरुन दिव्यांग व्यक्तीसाठी असणारा लाभ घेण्याचा प्रकार मे 2018 मध्ये जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आला. नंतर 7 जानेवारी 2022 ला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चार बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरणारे आरोपी विक्रम विष्णुकांत राठी, विश्‍वनाथ ग्यानदेव फाळके, महेश दशरथ मते, सुनिल खंडु पवार यांच्या विरूध्द भा.द.वि. कायदा कलम 420, 464, 465, 468, 471, 472 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाल्यानंतरही एकाही आरोपीला पोलीसांकडून अटक करण्यात आलेली नसल्याने दिव्यांग बांधवामध्ये तीव्र नाराजी पसरत आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या टोळीचा शोध न घेतल्यास 16 मार्च पासून पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारकावर कारवाई होण्यासाठी आम्ही सतत चार वर्ष पाठपुरावा केला. पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलीसांकडून आरोपींना अटक होत नाही, यासाठी उपोषण करावे लागते ही दुर्देवाची बाब आहे. आरोपींना तात्काळ अटक करून यामागील मुख्य दलालाचा शोध न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *