चर्मकार विकास संघाचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने एससी व एसटी यांचे उपवर्गीकरण व क्रीमिलेयरचा दिलेला निकाल रद्द होण्यासाठी चर्मकार विकास संघाच्या वतीने केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांना प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी निवेदन दिले.
1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एससी व एसटी यांचे उपवर्गीकरण व क्रीमिलेअर लागू करण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. या संदर्भात एससी व एसटी समाज भयभीत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोठी नाराजी पसरली आहे. हा निकाल एससी व एसटी समाजावर अन्यायकारक व समाजा-समाजात दुरावा निर्माण करणारा असल्याचा आरोप चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आला आहे.
हा निकाल एससी व एसटी यांच्यात कटुता निर्माण होऊन एससी, एसटी समाजाच्या विभाजनास खतपाणी घालणारा ठरणार आहे. या निकालचे गांभीर्य ओळखून या निकाला संदर्भात तात्काळ केंद्रीय विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल एकमताने रद्द करावा व एससी एसटी यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, युवा गटई जिल्हाध्यक्ष रुपेश कांबळे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे उपस्थित होते.