सलग तिसऱ्या वर्षी मिळवले यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी पियूष सुनिल धस याची सलग तिसऱ्या वर्षी शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातून निवड झाली आहे.
पियूष हा इयत्ता दहावीत शिकत असून, त्याने शहरी 17 वर्षाखालील मुलांच्या गटात यश मिळविले आहे. ही स्पर्धा नुकतीच शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे पार पडली. पियूष याने यापूर्वी अनेक व्यावसायिक बुद्धिबळ व चित्रकला स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे.
यासाठी त्याला बुद्धिबळ प्रशिक्षक प्रज्वल आव्हाड आणि क्रीडा शिक्षक अजित लोळगे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे प्राचार्या राधिका जेऊरकर, शालेय शिक्षक व सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.