स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गावात देशभक्तीचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, नगर तालुका पंचायत समिती, निमगाव वाघा ग्रामपंचायत, नवनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. वीरांना वंदन! करुन भारत मातेच्या जय घोषात गावातून निघालेल्या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी स्वातंत्र्य चळवळीतील नेते, हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, निमगाव वाघा सरपंच लताताई फलके, हिवरे बाजारच्या सरपंच विमल ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, कचरु कापसे, अरुण कापसे, मंदा साळवे, अरुण फलके, वर्षा औटी, शांता नरवडे, किरण सांगळे, विजय शिंदे, अमोल वाबळे, राणी पाटोळे, मयुरी जाधव आदींसह ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या जोरदार घोषणा दिल्या. गावातील शहीद स्मारक येथे देशाच्या सिमेवर शहिद झालेले गावातील सुपुत्र गोरख नाना जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वीर जवानांना नमन करण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचे ऋण न फेडता येणारे आहे. त्यांच्या स्मरणाने देश कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. या वीरांच्या स्मृतीला नमन करुन सक्षम भारत उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाने संपूर्ण गावाचे वातावरण देशभक्तीमय बनले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै. नाना डोंगरे यांनी केले.