शासनस्तरावर कलाकार म्हणून नोंद घेतली जात नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित
पिढ्यानपिढ्या कलावंत म्हणून पोतराज व वाजंत्री वर्ग समाजापुढे -भाऊसाहेब उडाणशिवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात लोककलावंत म्हणून वावरणाऱ्या दुर्बल घटकातील पोतराज व वाजंत्री कलावंतांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची मागणी पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे, वाजंत्री जिल्हाध्यक्ष विशाल वैरागर, जिल्हाध्यक्ष लखन लोखंडे, पवन शेरकर, प्रतीक शेलकर, राहुल वैरागर, गणेश गायकवाड, विकास उडाणशिवे, विकास धाडगे, कैलास शिंदे आदींसह पोतराज व वाजंत्री कलाकार उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी पारंपरिक पोतराज व वाजंत्री वर्ग जोडला गेलेला आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून ते लोकजागृतीचे कार्यही करत आहे. विविध जत्रा, धार्मिक सोहळ्यात कलेचे सादरीकरण करुन ते संस्कृती जोपासण्याचे काम करत आहे. घराघरात पोहोचणारा एकमेव पारंपारिक कलावंत म्हणून पोतराची ओळख आहे.
एकत्र कुटुंब, दारूबंदी, हुंडाबंदी, सार्वजनिक स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या आदी सामाजिक विषयांवर गायन-वादन व नृत्य करुन पोतराज व वाजंत्री लोकजागृतीचे कार्य करत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सरकार दरबारी त्यांची कलाकार म्हणून नोंद घेतली जात नसून, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आर्थिक दुर्बल घटक असलेल्या या वर्गाची सरकार दरबारी नोंद घ्यावी व शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्यासाठी संघटना आग्रही आहे.
ज्येष्ठ कलावंतांच्या मानधन योजनांचा लाभ ज्येष्ठ पोतराज व वाजंत्री यांना मिळावा, पोतराज व वाजंत्री यांना ओळखपत्र द्यावे, पोतराज वाजंत्री यांची सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे महापोर्टलद्वारे कलाकार म्हणून नोंदणी केली जावी, 15 ते 35 वयोगटामधील युवक पोतराज वाजंत्री यांना दरमहा 5 हजार रुपये द्यावे, या कलावंतांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, घरकुलामध्ये राखीव कोटा दिला जावा, त्यांच्या विकासासाठी अर्थसाह्य उपलब्ध करावे, अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा असल्याने वृद्ध कलावंतांसाठीचा कोटा वाढवून देण्याची मागणी पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महागाईच्या काळात दुर्बल घटकातील पोतराज व वाजंत्री कलावंत बिकट परिस्थितीत जगत आहे. शासनाने त्यांना आधार देण्याची गरज आहे. पिढ्यानपिढ्या कलावंत म्हणून हा वर्ग समाजापुढे आहे. शासनाने त्यांच्या धोरणात बदल करुन पोतराज व वाजंत्री यांना इतर कलावंताप्रमाणे शासकीय योजनांचा लाभ द्यावा. अन्यथा पोतराज व वाजंत्री राज्यभर तीव्र आंदोलन उभे करेल. -भाऊसाहेब उडाणशिवे (संस्थापक अध्यक्ष, पोतराज वाजंत्री संघटना)