साहित्य संमेलनातून सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडते -आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाजाला साहित्यातून संस्कार व समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आगळे-वेगळे आहे. साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडत असते. साधुसंतांच्या विचाराने कल्याण होत असते, संत भगवान बाबांचे विचार घेऊन समता निर्माण करण्याचे व समाजाला जोडण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. दऱ्या-खोऱ्यात, डोंगररांगात राहणारा वंजारी समाज शिक्षण घेऊन शहरात आला. या समाजाने शिक्षणातून प्रगती साधली असून, शासकीय अधिकारी वर्गापासून ते उद्योजक, व्यावसायिक आणि राजसत्तेतही आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. या समाजातील शेवटच्या घटकांचा विकास साधण्यासाठी उच्चशिक्षणाने प्रगती साधली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
निर्मलनगर, संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्स मध्ये रविवारी (दि.25 ऑगस्ट) वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन संत भगवान बाबा यांची प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष लेखिका तथा कवियत्री संगीता घुगे, साहित्यिक गणेश खाडे, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळचे अध्यक्ष कवी प्रा. वा.ना. आंधळे, स्वागताध्यक्ष तथा विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघव पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले, सहस्वागत अध्यक्ष घनश्याम बोडखे, रेणुकाताई वराडे-सानप, अर्जुन वायभासे, मल्हारी खेडकर, रामदास आंधळे, प्राचार्य नवनाथ आघाव, आनंद लहामगे, सुधीर पोटे, युवराज पोटे, सागर मुर्तडकर, संतोष ढाकणे, भीमराज आव्हाड, राहुल सांगळे, वैभव ढाकणे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, लक्षराज सानप आदींसह वंजारी समाजबांधव, महिला व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी 100 ढोल व 20 ताशे असलेल्या पथकासह पारंपारिक वादनाने निर्मलनगर परिसरातून साहित्य दिंडी काढण्यात आली. या साहित्य दिंडीत साहित्यिकांसह समाजबांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान बाबा चौकापासून निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप गंगा लॉन येथील साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम स्थळी झाला. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर यांनी एकदिवसीय साहित्य संमेलनाची रुपरेषा सर्वां समोर मांडली.
पाहुण्यांचे स्वागत करुन स्वागताध्यक्ष राजकुमार आघाव म्हणाले की, संस्कृतीला बळकटी देणारे व समता, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले. सर्व समाजातील घटकांना यामध्ये सामावून घेऊन प्रत्येक समाजात निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. राज्यातून दोनशेपेक्षा अधिक साहित्यिक यामध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अक्षय कर्डिले म्हणाले की, चांगल्या भावनेने हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व समाजातील व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करून समता प्रस्थापित करण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हा लोकहिताचा आहे. समाजाला संघटित करून लोकहिताचे कार्य वंजारी महासंघ करत आहे. समाजाला पाठबळ देण्याचे काम करुन विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी समाजाबरोबर उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. गजानन सानप म्हणाले की, साहित्य व सामाजिक कार्य एका समाजापुरते मर्यादीत नसते. थोर महापुरुष व संत महात्मे यांनी केलेले कार्य एका समाजापुरते नव्हते. त्यांच्या सामाजिक क्रांतीतून सर्व समाजाचा उध्दार झाला. साहित्यामध्ये सामाजिक क्रांती घडविण्याचे बळ असून, समाजाला साहित्यातून योग्य दिशा व विचार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभर विविध सत्रामध्ये साहित्य संमेलन रंगले होते. राज्यातून आलेल्या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. तर पुस्तकांच्या प्रदर्शनातून साहित्याचा खजिना यावेळी साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. समारोपीय सत्रात काव्य संमेलन रंगले होते. राज्यातील नामवंत कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण करुन समाजव्यवस्थेची वास्तवता मांडली तर काही कवींनी विनोदी शैलीने संपूर्ण सभागृहाला हसविले. या संमेलनाच्या माध्यमातून वंजारी समाजासह साहित्यप्रेमी एकवटले होते.