विविध क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा गौरव
ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांचे रक्तदान; संस्थेच्या अन्न यज्ञात अनेकांची मदत जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सेवाभावाने गरजूंना जेवण पुरविणाऱ्या हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचा पाचवा वर्धापन दिवस सामाजिक कार्याचा जागर करुन साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आणि प्रसिध्दीपासून लांब राहिलेल्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात अनेक व्यक्तींनी संस्थेच्या अन्न यज्ञात मदत जाहीर केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, माजी शिक्षणाधिकारी संजय मेहेर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाबासाहेब वाकळे, संभाजी कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, पै. मनोज लोंढे, संभाजी कदम, दत्ता कावरे, प्रा. सिताराम काकडे, प्रमोद कांबळे, भरत कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उमेश पंडुरे, सचिन गारदे, डॉ. अडचित्रे, जयंत भागवत, अविनाश देडगावकर, वस्ताद संतोष टेकाळे, स्वप्नील कुऱ्हे, अजय धोपावकर, अक्षय वैद्य, सागर कोरडे, भूषण देशमुख, पवन नाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील विशेष कामगिरी व निस्वार्थ कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याचवेळी संस्थेचे विशेष सेवक जयश्री हिंगे,सुलभा राऊत व प्रमिला जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरु झालेली ही अन्न यज्ञाची सेवा आज पर्यंत सुरु आहे. 7 सदस्यांपासून सुरु झालेल्या या कार्यात 40 सदस्य जोडले गेले असून, अनेक गरजूंना अल्पदरात जेवण पुरविण्यात येत आहे. तर चिपळूण येथे महापुरात लोकांना मदत देऊन जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत लोकसहभागाने हे सेवा कार्य सुरु असून, कार्याचे विस्तार करण्यासाठी भोजन गृह उभारणीचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला.
गिरीश कुलकर्णी म्हणाले की, हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुपचे तळमळीने कार्य सुरू आहे. आपुलकी व प्रेमाने अन्न दिले जाते. हेल्पिंग हॅण्डस हे देवाचे हात असून, भुकलेल्यांपर्यंत अन्न पोहचविण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.भगवान फुलसौंदर यांनी या संस्थेने माणसातला देव शोधून मानवसेवा सुरू केली आहे. स्वतः झोकून देऊन सेवा देत असल्याचे कौतुक केले. संभाजीराजे कदम यांनी फ्री हॅण्डने हेल्पिंग हॅण्ड ग्रुपचे समाजकार्य सुरु असल्याचे सांगून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अभिषेक कळमकर म्हणाले की, हेल्पिंग हॅण्डस् संवेदनशीलतेने भुकेलेल्यांना जेवण देत आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करत आहे. त्यांच्या कार्याला सलाम असल्याचे सांगून, श्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर प्रा. सिताराम काकडे व वस्ताद संतोष टेकाळे यांनी देखील संस्थेच्या अन्न यज्ञासाठी मदत जाहीर केली.
सुफी गायक पवन नाईक यांनी सादर केलेल्या आनंद हा जीवनाचा परी दरवळावा! हे गीत सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुलकर्णी व नंदेश शिंदे यांनी केले. आभार संजय खोंडे यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष नाना भोरे, राजेंद्रशेठ मालू, अविनाश मुंडके, दिलीप गाडेकर, प्रशांत देशपांडे, किशोर कुलकर्णी, मनोज गुजराथी, नवीनचंद्र बजाज, अजय गांधी, संगिता भोरे, मनिषा शिंदे, वर्षा शेकटकर, अशोक साळुंके, आशुतोष देवी, आशिष शिंदे, ऋषी शिंदे, अनंत रिसे, सिद्धीनाथ मेटे, शंकर पवार आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.
हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने रक्तदान
दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मागील पाच वर्षापासून वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. संस्थेच्या वतीने गरजूंना कार्ड उपलब्ध करुन देऊन जिल्हा रुग्णालय रक्त पिढीच्या माध्यमातून मोफत रक्त पिशव्या उपलब्ध करुन दिल्या जातात. याचा लाभ डायलेसिस, कॅन्सर व अपघातील रुग्णांना होत आहे. मागील वर्षी 75 गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करुन देण्यात आले.