आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य -डॉ. प्रकाश कांकरिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- हेलपिंग हॅण्ड्स युथ फाउंडेशन व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसने निरीक्षण व बालगृहातील (रिमांड होम) मुलांची सहल घडवली. एमआयडीसी येथे साईबनमध्ये घेऊन जाण्यात आलेल्या सहलीतील उपेक्षित घटकातील मुलांनी मोठी धमाल करुन विविध खेळांचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर सहलीचा आनंद ओसंडून वाहत होता.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, उपेक्षित घटकातील विद्यार्थी समाजातील एक घटक असून, त्यांना मुख्य प्रवाहात आनण्याचा कांकरिया परिवाराचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. साईबनमध्ये या विद्यार्थ्यांची खास सोय करण्यात आली होती. आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य आहे. उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कांकरिया परिवाराचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. भैय्या बॉक्सर म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षापासून फिरायला न गेलेल्या रिमांड होमच्या विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटल्याचे त्यांनी सांगितले. या सहलीसाठी शशिकांत गाडे, अनिल शिंदे, जयंत ओहोळ, किरण बोरुडे यांचे विशेष सहकार्य लाभले.