• Wed. Dec 11th, 2024

सैनिक बँकेतील शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे निलंबित

ByMirror

Aug 28, 2022

निलंबनाऐवजी बडतर्फ करा -विनायक गोस्वामी

निराधारांची रक्कम हडप केल्याचे प्रकरण भोवले

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत वृद्ध, अपंग, निराधार यांच्यासाठी असलेल्या व मयत लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करणारा शाखा व्यवस्थापक सदाशिव जयवंत फरांडे याला खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी निलंबित केले असल्याची माहिती बँकेचे सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन व विनायक गोस्वामी यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देताना बाळासाहेब नरसाळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, सदाशिव फरांडे, दीपक अनारसे यांनी निराधार लोकांचे अनुदान हडप केले असल्याचं निष्पन्न झाले होते.

त्यामुळे लिपिक दीपक अनारसे व शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांच्यावर शासकीय गुन्हा दाखल झाला होता. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व अन्य योजनेतील मयत लाभार्थी यांच्या नावावर आलेली रक्कम शाखाअधिकारी सदाशिव फरांडे व दीपक आनरसे यांचे नातेवाईक असणार्‍या व्यक्तीच्या खात्यात जमा करून ती रक्कम हडप केली होती. हे प्रकरण उघड होताच चेअरमन यांनी अनारसे याला पुन्हा कामावर घेण्याचे आमिष दाखवत स्वतः वर सर्व जबाबदारी घेण्यास भाग पाडले व त्याच्यावर गुन्हा दाखल करत निलंबित केले. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असेलेल्या शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे याला अभय देण्यात आले होते.

सहकार आयुक्त यांनी बँकेला फरांडे याला बडतर्फ करा असे पत्र देऊनही कोरडे कारवाई करत नसल्याने कोरडेनां पॅनल वरून हटवा अशी मागणी सभासदांनी केली होती. यानंतर कोरडेनीं फरांडे याला 20 ऑगस्ट रोजी सभेच्या विषय क्रमांक 23 नूसार बडतर्फी ऐवजी निलंबन केले आहे, ते ही चौकशी पूर्ण होईपर्यंत. कर्जत शाखेत फरांडे याने गेली दहा वर्षांत मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे, चेअरमन शिवाजी व्यवहारे यांच्या पाठबळावर लाखो रुपयांचा गैर व्यवहार केला असल्याच्या तक्रारी सहकार आयुक्त यांच्याकडे केल्या आहेत. फरांडे याच्या वर शासकीय गुन्हा दाखल असल्याने याला निलंबनाऐवजी बडतर्फ करायला पाहिजे होते. जो पर्यंत बडतर्फ होत नाही तो पर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असून वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे संस्थापक सभासद विनायक गोस्वामी यांनी म्हंटले आहे.

फरांडे कडून कर्जत शाखेत अनेक घोटाळे?

सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालक यांना हाताशी धरत फरांडे गेली 10 वर्ष कर्जत शाखेत शाखा व्यवस्थापक होता. या काळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार, झाला असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल आहेत. कर्ज फायली, बोगस चेक, आदी अन्य प्रकाराच्या तक्रारी आहेत. सदर प्रकरणाची निष्पक्ष तपासणी झाल्यास फरांडे सह त्याला पाठबळ देणारे मुख्यकार्यकारी आधिकारी व चेअरमन हे ही चौकशी फेर्‍यात सापडतील. मुख्यकार्यकारी आधिकार्‍याच्या मर्जीतील फरांडे असल्याने आजही कर्जत, जामखेड, शाखेतील कारभार पहात असल्याचे सभासदांच्या निदर्शनास आले आहे. त्याला त्वरित बँक कामकाजापासून दूर ठेवा अन्यथा शाखेसमोर आंदोलन करू असे कर्जत, जामखेड येथील सभासदांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *