गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी महिला सदस्यांचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन विविध स्वरुपात मदत करणार्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी आनंदी बजार येथील पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयातील 42 गरजू मुलींना शालेय गणवेशचे वाटप केले. सेवाप्रीतच्या महिला सदस्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी योगदान देत असून, या उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सुशिला मोडक, प्रकल्प प्रमुख रितू वधवा, सुमन कपूर, प्रिती धुप्पड, कविता दरंदले, शिल्पा सबलोक, मीरा बारस्कर, राजश्री पोहेकर, सुरेखा बारस्कर, भारती शेवते, स्वाती ठाकूर, वंदना ठुबे, मनिषा उल्हारे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, स्कूल कमिटीचे अध्यक्ष शैलेंद्र गांधी, मुख्यध्यापिका रोहिणी फळे, पी.डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, मुली शिक्षण घेऊन दोन कुटुंबांना प्रकाशमान करत असते. मुलगी ही शिकलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट गुण असतात, स्वतःला कमी न लेखता आपल्यातील गुण ओळखता आले पाहिजे. परिश्रम व जिद्दीने यश गाठता येते. मुलींनी ध्येय ठरवून उच्च शिक्षनाने ते साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अजित बोरा म्हणाले की, कोरोना काळात सेवाप्रीतने उत्तम सामाजिक कार्य केले. अन्नदानाबरोबरच गरजू घटकातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सर्वसामान्य गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. भारती शेवते म्हणाल्या की, मुलींनी जीवनात स्वाभीमानाने जगावे. स्त्री हे शक्तीचे रूप असून, कोणत्याही परिस्थितीला महिला तोंड देऊ शकतात. मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवावे. स्वत: कणखर होऊन अन्यायाचा बीमोड व प्रतिकार करता आला पाहिजे. शिक्षणाशिवाय कोणत्याही गोष्टीला महत्त्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिरिष मोडक म्हणाले की, परिस्थितीने निराश न होता, मनातील भिती व न्यूनगंड दूर करून जीवनातील ध्येय साध्य करुन यश संपादन करावे. ध्येय प्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी व आत्मविश्वास गरजेचा आहे. हिंद सेवा मंडळ सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाज घडविण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. तसेच सेवाप्रीतने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी सुरु केलेली चळवळ प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी कुलकर्णी यांनी केले. आभार रितू वधवा यांनी मानले. या उपक्रमासाठी सेवाप्रीतच्या सदस्या साक्षी चुग, श्वेता गांधी, सोनिया अॅबट, अनुभा अॅबट, उषा ढवण, विजया सारडा, अनिता शर्मा, इशा जग्गी, मंगला झंवर, हर्षा हिरानंदानी यांचे सहकार्य लाभले.