एक व्यक्ती, एक वृक्ष भावी पिढीच्या भवितव्यासाठीचा संदेश देत केले वृक्षरोपण
महिलांच्या योगदानाने पर्यावरण चळवळीला गती मिळणार -विक्रांत मोरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या महिलांनी भिंगार येथील छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क परिसरात वृक्षरोपण अभियान राबविले. दुर्बल घटकातील मुलांच्या शैक्षणिक कार्यासह विविध सामाजिक कार्यात योगदान देणार्या महिलांनी एक व्यक्ती, एक वृक्ष भावी पिढीच्या भवितव्यासाठी! चा संदेश देऊन हा उपक्रम राबविला.
छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या हस्ते रोप लाऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता निरीक्षक रमेश साके, सीएसआरडीचे डॉ. सुरेश पठारे, गणेश भोर, सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, गिता नय्यर, सविता चड्डा, सिमा गुलाटी, निशा नारंग, निकिता गुप्ता, सोनिया कुंद्रा, लविष्का माखीजा, संगिता ओबेरॉय, डॉली मेहता, शेरी धुप्पड, सविता धुप्पड, इरीश सहानी, रिध्देश खंडेलवाल, पुर्व ओबेरॉय, संकल्प खंडेलवाल, इरेश सहानी, निकुंज खंडेलवाल आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने एक वृक्ष लावून, त्याचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. निसर्गाने मनुष्याला भरभरुन दिले, मात्र मनुष्याने निसर्गाची मोठी हानी केली आहे. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलांप्रमाणे झाडे लाऊन ती वाढविण्याची गरज असून, अन्यथा सजीव सृष्टीचे असतित्व धोक्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी राबविलेला उपक्रम दिशादर्शक असून, महिलांच्या योगदानाने पर्यावरण चळवळीला गती मिळणार आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन अशा उपक्रमांना छावणी परिषदेचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. डॉ. सुरेश पठारे यांनी निसर्ग मानवाला मिळालेला वरदान आहे. निसर्गाच्या सानिध्यात मनुष्य सुखी, समाधानी, निरोगी व आनंदी जीवन जगू शकतो. मात्र स्वार्थासाठी मनुष्याने निसर्गावरच घाव घातल्याने त्याचे दुष्परिणाम दिसत असून, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने गौतम बुध्द जॉगिंग पार्क समोर एका रांगेत व जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करुन त्याभोवती संरक्षक कुंपन टाकले आहे. तसेच या लावलेल्या झाडांची संवर्धनाची जबाबदारी छावणी परिषदने स्विकारली आहे. या वृक्षरोपण अभियानात महिलांनी आपल्या मुलांना देखील सहभागी करुन त्यांना वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व सांगितले.