मेहेर इंग्लिश स्कूल मध्ये रक्षा बंधन साजरा करुन विद्यार्थ्यांच्या वाचनालयास पुस्तकांचे वाटप
समता, स्वातंत्र्यता व बंधुता लोकशाहीचे सर्वात मोठे यश -जागृती ओबेरॉय
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक भेट दिले. तर शाळेत रक्षा बंधन साजरा करुन विद्यार्थ्यांच्या वाचनालयास विविध पुस्तकांची भेट देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख स्विटी पंजाबी, सुशिला मोडक, डॉ. बिंदू शिरसाठ, उर्मिला झालानी, सविता चड्डा, नंदिनी जग्गी, गीता नायर, खुशबू चोप्रा आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य कसे व कोणत्या परिस्थितीत मिळाले? याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असायला हवी. क्रांतीकारकांनी आपले बलिदान देऊन देश स्वातंत्र्याचा लढा यशस्वी केला. स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट उगवण्यासाठी अनेकांचे बलिदान आहे. विविधतेमध्ये एकतेने नटलेला भारत देश असून, सर्व जाती-धर्माचे नागरिक बंधू भावाने एकत्र राहतात. समता, स्वातंत्र्यता व बंधुता हेच या लोकशाहीचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. या भावनेने सेवाप्रीतच्या महिला सदस्या योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी त्यांना कला, क्रीडा, सांस्कृतिक धडे दिले जात असून, त्यांच्यावर संस्कार देखील घडवले जात असल्याचे सांगितले. अध्यक्षीय सूचना गीता वल्लाकट्टी यांनी मानली. शालेय विद्यार्थिनींनी प्रारंभी देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी पाहुण्यांना शालेय विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या.
अजित बोरा म्हणाले की, विद्येच्या ज्ञानगंगेने विकास साधला जाणार आहे. या विकासासाठी सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाप्रीत देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. हिंद सेवा मंडळ शिक्षणाने समाज घडविण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. अनंत फडणीस यांनी तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय ज्ञान आवश्यक झाले आहे. प्रवाहात टिकण्यासाठी काळानुरुप बदल स्विकारला पाहिजे. विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणापेक्षा अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी सेवाप्रीतने दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा भालेराव यांनी केले. आभार शितल दळवी यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीतच्या कविता काथडे, सुरेखा मनियार, आरती लोहाडे, शिलू मक्कर, सिम्मी मक्कर, मिना हरवानी, डॉ. अलका त्र्यंबके, सिमा गुलाटी (मुंबई), सुलभा मोडक यांनी योगदान दिले.