तर नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील निरीक्षण गृह व बालगृहातील (रिमांड होम) नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लिडर निशा धुप्पड, नताशा धुप्पड, गीता धुप्पड, डॉ. सोनाली वहाडणे, अर्चना ओबेरॉय, संगीता अॅबट, बाबू धुप्पड, रिता बक्षी, दिशा ओबेरॉय आदी उपस्थित होते.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, नैराश्यामुळे जीवनात यश मिळवता येत नाही. परिस्थितीने निराश न होता, मनातील भिती व न्यूनगंड दूर करून जीवनातील ध्येय साध्य करुन यश संपादन करावे. ध्येय प्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी व आत्मविश्वास गरजेचा आहे. जीवनात गुरु हे खरे मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात. त्यांच्या मार्गदर्शनाने जीवन मार्गक्रमण करुन खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अर्चना ओबेरॉय म्हणाल्या की, प्रत्येक गुलाबाचे फुल उमळताना त्याला काटेरी प्रवास असतो. रात्रनंतरच सुर्योदय होत असतो, त्याप्रमाणे खडतर प्रवासानंतर चांगले दिवस येणार हे निश्चित आहे. यासाठी चिकाटी व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक असून, कठिण प्रसंगांना सामोरे गेल्याशिवाय चांगले दिवस उजडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटनानंतर जनजीवन रुळावर येत असले तरी, सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाढत असलेली महागाईमुळे गरजू घटकातील विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाह व शिक्षणाचा प्रश्न विकट बनला असून, त्यांच्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशन कार्य करत असल्याचे उपस्थित महिलांनी स्पष्ट केले. ग्रुप लिडर निशा धुप्पड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी फळ, चॉकलेट, मिठाई व थंड पेय वाटप केले. दूध पॉवडरचे बॉक्स व किराणा साहित्य निरीक्षण व बालगृहाच्या अधीक्षका पौर्णिमा माने यांना सुपुर्द करण्यात आले.