रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगरसेवकाच्या मुलीने सूड घेण्याच्या हेतूने पतीसह सासरच्या सुशिक्षित कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून सूड घेण्याच्या भावनेने जामखेड येथील नगरसेवकाच्या मुलीने राजकीय बळाचा वापर करुन त्याच्या सुशिक्षित पतीसह सासरच्या कुटुंबीयांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केल्याचा तपास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, नईम शेख व पिडीत शेख कुटुंबीय उपस्थित होते.
जामखेड पोलीस स्टेशन मध्ये विवाहित महिलेच्या फिर्यादीवरुन 3 मे रोजी कलम 307, 323, 504, 506, 345 प्रमाणे तिचा पती सोहेल कलंदर शेख, दीर आदिल कलंदर शेख, सासरे कलंदर करीम शेख, सासू आयशा कलंदर शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. महिला ही एका नगरसेवकाची मुलगी असून, त्यांचे मोठे राजकीय वरदहस्त व संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचे घनिष्ठ संबंध आहे. महिलेचा पती व त्याचा दिर सुशिक्षित असून, एका चांगल्या खासगी कंपनीत नोकरीला आहे. सदर कुटुंबीय गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून, सुशिक्षित आहे. कौटुंबिक वादातून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादाचा दावा दिवाणी न्यायालयात सुरु असून, महिलेच्या फिर्यादीवरुन ही घटना 29 एप्रिलला घडल्याचे म्हंटले आहे. मात्र सदर कौटुंबिक वादात समझोता झाला नसून, महिला नांदण्यास आली नसल्याने ही घटना कशी घडली हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल झालेला त्याचा पती सोहेल शेख सकाळी 11 ते 5 दरम्यान एमआयडीसी येथील एका खासगी कंपनीत कामावर होते. त्याबाबतचा अहवाल देखील कंपनीने दिला असून, महिलेच्या सांगण्यावरुन सदर घटना दुपारी 1 ते 2 दरम्यान घडली असल्याचे म्हंटले आहे. यावरुन दाखल झालेला गुन्हा संशयाच्या भोवर्यात असून, खोटा गुन्हा दाखल झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या खोट्या गुन्ह्यामुळे धास्तावलेले शेख कुटुंबीय आपले घर सोडून नगर शहरात भाड्याने राहत आहे. फिर्यादी महिलेचे नगरसेवक असलेल्या वडिलाने सदर कुटुंबीयांवर पुन्हा अॅट्रोसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यास धमकावले असून, या कुटुंबीयांवर झालेल्या गुन्ह्याची चौकशी व्हावी व गुन्हे दाखल करताना शहानिशा करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.