दिपाली ढगे, सुप्रिया मकासरे, अक्षदा बेल्हेकर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाचे करणार प्रतिनिधित्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, राहुरी कृषी विद्यापिठ मधील खेळाडू दिपाली दिलीप ढगे, सुप्रिया अरुण मकासरे, अक्षदा भारत बेल्हेकर या तीन विद्यार्थिनींची निवड नुकतेच नाशिक येथे होत असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नाशिक येथे 13 ते 15 मे दरम्यान 17 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होत आहे. निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थिनी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाकडून खेळणार आहेत. सराव सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर त्यांची जिल्हा संघात निवड झाली असून, या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.जी. पाटील, सचिव डॉ. एम.एस. माने, खजिनदार एम.डी. घाडगे, प्राचार्या आशा धनवटे आदींसह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी व पालक वर्ग यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनींना ज्येष्ठ क्रीडाशिक्षक शमशुद्दीन इनामदार, क्रीडाशिक्षक घनश्याम सानप, संतोष जाधव, फुटबॉलचे प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, मेजर सुभाष सर आदींचे मार्गदर्शन लाभले.