होम-हवन व वेदमंत्राच्या जयघोषात धार्मिक सोहळा पार
अहमदनगर(प्रतिनिधी)- सारसनगर राजश्री सोसायटी येथे भक्तांनी उभारलेल्या पावन लिंबाचा मारुती मंदिरात हनुमानजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.25 एप्रिल) संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते झाली. सकाळी होम-हवन व वेदमंत्राच्या जयघोषात परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला.
मंदिरात मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त मागील तीन दिवसापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. प्राणप्रतिष्ठेसाठी झालेल्या होम-हवन व पूजेसाठी यजमान म्हणून प्रशांत येवले, उर्मिला येवले, योगेश आगरकर, स्वाती आगरकर, रुपचंद खिळे, विमल खिळे, रावेंद्र आहेर, सुवर्णा आहेर उपस्थित होते.
सारसनगर हा शहराला लागून असलेला उपनगर आहे. या परिसराचा विस्तार होत असून, मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहे. या भागात हनुमान मंदिर नव्हते. या भागातील भक्तमंडळींनी पुढाकार घेऊन पावन लिंबाचा मारुती मंदिराची उभारणी केली असून, या मंदिराला मुर्तस्वरुप प्राप्त झाले आहे.
या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, नगरसेविका शितल जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे व सारसनगर भागातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे संचालक मंडळ संतोष नवसुपे, रामदास आगरकर, सुनिल कचरे, शिवाजी येवले, शंभू नवसुपे, रुपचंद खिळे, राजेंद्र दळवी, योगेश गाडेकर, माजी नगरसेवक दत्ता मुदगल, हिराभाऊ धोंडे, रामराव शिंदे, यशवंत गारडे, समीर खडके आदी उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिर उभारणीसाठी योगदान देणार्यांचे मंदिराचे संचालक मंडळाने आभार मानले.