जागतिक सायकल दिवसाचा नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ आरोग्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. उत्तम आरोग्य पैश्याने विकत मिळत नाही तर मैदानावर प्रत्येकाने उतरले पाहिजे. सायकल चालवणे आरोग्यासाठी व प्रदुषणमुक्तीसाठी सर्वोत्तम पर्याय असून, त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. सदृढ आरोग्य हीच खरी धनसंपदा असून, युवकांमध्ये याविषयी जागृती होण्याची गरज असल्याची भावना क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केली.
जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे सायकल रॅली काढण्यात आली. नवनाथ विद्यालयात क्रीडा शिक्षक पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर करीत गावातून सायकल रॅली काढली होती. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, लहानू जाधव आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
निळकंठ वाघमारे म्हणाले की, योगा, धावणे, सायकलिंग, पोहणे यांसह मैदानी खेळासाठी प्रत्येक युवक-युवतींनी दररोज वेळ दिला पाहिजे. व्यायामाने शाररीक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तसेच योग्य आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगून, व्यसनापासून लांब राहून शरीर संपदा जपण्याचे आवाहन केले. पै. नाना डोंगरे यांनी मुलींनी देखील मुलांप्रमाणे सर्व मैदानी खेळ खेळून दैनंदिन जीवनात व्यायाम केला पाहिजे. मुलींमध्ये आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून, व्यायामाचा अभाव व चुकीची आहार पध्दत हे मुख्य कारण आहे. तसेच मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन सक्षम होऊन, मैदानी खेळ व व्यायामाने निरोगी आरोग्य जगण्याचा त्यांनी सल्ला दिला. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.