मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजनचे वाटप
समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून महापुरुषांच्या कार्याचा जागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. वडगाव गुप्ता रोड येथील मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजनचे वाटप करुन संध्याकाळी सावेडी येथे घेण्यात आलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून महापुरुषांच्या कार्याचा जागर करण्यात आला.
बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष संतोष जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्चांना फाटा देऊन वंचित घटकातील मूक बधिर विद्यार्थ्यांसह आपला वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा केला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल शेकटकर, भगवान जगताप, झोन प्रभारी राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, वैभव जाधव, मनोज उघडे, मुख्याध्यापक तेरेजा भिंगारदिवे, दिलीप जगधने आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केली. फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला असून, त्यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राजू शिंदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दीनदुबळ्यांना आधार व नवयुवकांना प्रेरणा देण्यासाठी महात्मा फुले जयंती दिनाचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष जाधव यांनी युवकांच्या माध्यमातून बदल घडणार असून, युवकांनी वाढदिवस, सण, उत्सव व महापुरुषांची जयंतीला इतर वायफट खर्चांना फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.