शिक्षक आमदार गाणार यांनी 32 प्रश्नांची विषय पत्रिका शिक्षण आयुक्तांकडे केली सादर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी 13 मे रोजी शिक्षण आयुक्तांकडे सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना 32 प्रश्नांची विषय पत्रिका सादर करुन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न मांडले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांसोबत शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयात 13 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. सहविचार सभेत शिक्षण विभागाचे सर्व संचालक, सहआयुक्त, आयुक्त परीक्षा मंडळ व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक सत्र 2013-14 पासून संचमान्यता दुरूस्तीचे प्रकरणे निकाली काढण्यात यावे, शैक्षणिक सत्र 2021-22 च्या संचमान्यतेबाबत अतिरिक्त शिक्षक कर्मचारी ठरविण्याबाबत, 28 ऑगस्ट 2015 चा शासन निर्णय रद्द करून तुकडी निहाय शिक्षक पद मंजूर करण्याबाबत, केंद्रीय प्रवेश पद्धती, अतिरिक्त शिक्षक, कर्मचारी समायोजन, पवित्र पोर्टल, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना मंजूर करणे, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचार्यांना डी.सी.पी.एस., एन.पी.एस. चे खाते नसलेल्या शिक्षक कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता वितरीत करण्याबाबत, 20 व 40 टक्के अनुदानाच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना नियमित वेतन मिळण्याबाबत, राज्यातील शिक्षक कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याचे वेतन एक तारखेला अदा करण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता जून 2022 च्या वेतनासोबत अदा करण्याबाबत, तसेच थकित वेतनाच्या प्रशासकीय मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ आयोजित करणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तींसह विविध 32 प्रश्न विषय पत्रिकेत मांडण्यात आले असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे.