अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या शिष्टमंडळाने केली शिक्षकेत्तरांच्या विविध प्रश्नावर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे राज्याध्यक्ष अनिल माने व सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांचे शहरात अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या शिष्टमंडळाने स्वागत करुन शिक्षकेत्तरांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली.
राज्याध्यक्ष माने व सरकार्यवाह खांडेकर यांचा जिल्ह्यातील शिक्षकेतरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव भानुदास दळवी, उपाध्यक्ष प्रदिप गोसावी, जयराम धांडे, सहसचिव नानासाहेब डोंगरे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, किशोर मुथ्था, जेष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब थोटे आदी उपस्थित होते.
सहसचिव नानासाहेब डोंगरे यांनी शिक्षकेतर कर्मचार्यांचे शासनस्तरावर अनेक प्रश्न प्रलंबीत असून, सत्ताधार्यांकडून फक्त आश्वासन मिळत आहे. दिवसंदिवस हे प्रश्न गंभीर बनत चालले आहे. सत्ताधारी बदलत असून, या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याध्यक्ष अनिल माने यांनी शिक्षकेतरांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच राज्यव्यापी बैठक घेतली जाणार आहे. शासन पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. शिक्षकेतरांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास वेळप्रसंगी आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी शासनस्तरावर शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती दिली.