निवृत्त कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक सन 1996 ते 2000 दरम्यान कामगार करारातील कपात केलेले पाच टक्के निधी परत मिळण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकित सर्व एस.टी. निवृत्त कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन बलभिम कुबडे, देवकर, बेळगे, बकरे यांनी आवाहन केले आहे.
या बैठकीत सन 1996 ते 2000 च्या कामगार करारातील मिळालेल्या एकूण रकमेतून पाच टक्के कपात केलेली मान्यताप्राप्त संघटनेकडून निधी परत मिळवण्यासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक अर्ज भरून घेतला जाणार आहे. सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यासाठी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीला सदर माहिती पाठवायची आहे. त्यासाठी ऑक्टोबर 1999 ते नोव्हेंबर 1999 मध्ये पाच टक्के कपात केलेली एकूण रक्कम किती? व आज रोजी मिळणारी व्याजासह रक्कम किती? अशी माहिती संबंधित युनिट कडून प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाचा माहिती अधिकार फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. या सोबतच मे 2019 पासून सेवानिवृत्तीच्या थकीत रकमेबाबत संघटनेची आगामी भूमिका काय राहणार? याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व डेपो स्तरावर देखील या विषयावर बैठक घेण्यात येणार असून, त्याचे नियोजन देखील कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.