विविध धार्मिक कार्यक्रमाने धर्मकल्याण व विश्वशांतीसाठी प्रार्थना
101 पुरुष व महिलांनी केली शिवदीक्षा ग्रहण
अहमदनगर (प्रतिनिधी)- पवित्र चातुर्मासनिमित्त शहरात वीरशैव जंगम समाज बांधवांचा इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा संस्कार सोहळा पार पडला. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्यातनिमित्त जंगम समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मकल्याण व विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
शिवदीक्षेशिवाय कोणत्याही विरशैवाला मोक्षप्राप्ती होत नाही, अशी जंगम समाजाची धारणा आहे. श्री नागनाथ देवस्थान जहागीरदार मठ संस्थानचे मठाधिपती गुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या अधिपत्याखाली 101 पुरुष व महिलांनी शिवदीक्षा ग्रहण केली. या सोहळ्याच्या प्रारंभी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी होम-हवन पार पाडले. त्यानंतर इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा संस्कार सोहळा संपन्न झाला. त्यानंतर गुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराजांनी आशिर्वाचन दिले. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी जंगम समाजाचे अध्यक्ष अध्यक्ष अशोक काटकर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर जंगम, सदाशिव स्वामी, सोमनाथ स्वामी, सचिव सुनील शेटे, खजिनदार संतोष संबळे, सोमनाथ जंगम, अनिल नाईकवाडे, विजय उजनीमठ, विशाल जंगम, रोहित लोणकर, चंद्रकांत काटकर, राजेंद्र धिंगाणे, महेश बागले यांनी परिश्रम घेतले.