मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध
सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा नंतर तेलंगणातील आमदार टी राजा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी (दि.25 ऑगस्ट) निषेध नोंदविण्यात आला.
टी. राजा यांची प्रतिमा असलेला प्रतिकात्मक पुतळ्यास मोर्चाने जोडे मारत आणून कोठला चौकात त्या पुतळ्याचे दहण करुन पायदळी तुडविण्यात आले. नुपूर शर्मा प्रकरणानंतर पुन्हा शहरात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद शहरात उमटले आहेत. या आंदोलनात मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बापूसहाब दर्गा येथून मोर्चाला सुरुवात करुन, कोठला चौकात आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी टी. राजा मुर्दाबाच्या जोरदार घोषणा दिल्या. तर देशात सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी करण्यात आली. राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे अल्पसंख्यांक समाजातील संत, महात्मे व पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला प्रेम, शांतता व बंधुत्वाची शिकवण दिली आहे. त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून भाजपचे पदाधिकारी व आमदार मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. कोणताही मुस्लिम व्यक्ती पैगंबरांबद्दल चुकीचे व बेताल वक्तव्य खपवून घेणार नसल्याचे आंदोलकांनी भावना व्यक्त केली.