शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित तीन दिवस चालणार आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला बडी साजन मंगल कार्यालयात शुक्रवार (दि.22 एप्रिल) पासून प्रारंभ झाले. सोहम ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित बुरा व बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव निरंजन गोडबोले यांनी बुद्धिबळ पटावर चाल देऊन स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जळगाव येथील ऑर्बिटर प्रवीण ठाकरे, ठाणे येथील ऑर्बिटर अजिंक्य पिंगळे, औरंगाबाद प्रीती समदानी, बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, कार्तिक सर आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहम ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित बुरा म्हणाले की, क्रीडा क्षेत्राला उभारी व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सदैव शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचा पुढाकार राहणार आहे. राज्यभरातून मानांकन स्पर्धेसाठी दाखल झालेल्या बुद्धिबळपटूंचे स्वागत करुन बुद्धिबळ ही मनाची व्यायाम शाळा आहे. नियमित व्यायाम केल्याने जसे आपलं शरीर बलशाली बनते, त्याप्रमाणे नियमित बुद्धिबळाचा सराव केल्याने आपण आपल्या मनालाही निरोगी ठेवू शकतो. स्वत: निरोगी राहून आपला समाज निरोगी ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकी ठेऊन सुदृढ समाजाची उभारणीसाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रतिभावंत खेळाडूंचे पालकत्व स्वीकारून, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला मुर्त स्वरुप देण्यासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व आय लव्ह नगर नेहमी खेळाडूंच्या पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव निरंजन गोडबोले म्हणाले की, या स्पर्धेचे नियोजन अतिशय छान व व्यवस्थित आहे. नगरमध्ये खेळायला येणार्या खेळाडूंसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. खेळाडूंनी या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावून आपले प्राविण्य दाखवावे. तसेच भविष्यात आपल्या विविध जिल्ह्यांत स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंसाठी फार मोठी संधी निर्माण केल्या जाणार असून, खेळाडूंनी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सचिव यशवंत बापट यांनी नगरमधील खेळाडूंसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे खेळाडूंचा खेळ उंचावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले. प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी खुली बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातील 232 खेळाडूंनी सहभाग घेतला असून, ही आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेचे प्रायोजक शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशनने स्विकारले असून तीन दिवस स्पर्धा चालणार असल्याचे सांगितले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराधा बापट, डॉ.स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, देवेंद्र ढोकले, मनीष जसवाणी, प्रकाश गुजराती, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी आदी परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले. तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.