शहरातील तीन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे काम दोन महिन्यापुर्वी सुरु करुन सोडले अर्धवट
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आयुक्तांनी शहरात शंभर रस्ते केल्याची कबुली दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवरुन राजकारण तापले आहे. सर्वसामान्यांमध्ये देखील त्याचे पडसाद उमटत आहे. रस्त्यावरील खड्डे व धुळीने सर्वसामान्य नागरिक वैतागले असताना सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गुंडला यांनी तोफखाना भागातील तीन वर्षापुर्वी मंजूर झालेला रस्ता दोन महिन्यापुर्वी काम सुरु करुन अर्धवट सोडून देण्यात आल्याचा आरोप केला आहे. सदर रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तोफखाना भागातील संबोधी हायस्कूल सुराणा बिल्डिंग ते महेसुनी टेलर शितलादेवी पर्यंतचा रस्ता 2019 ला मंजूर झालेला असल्याची बाब त्यांना माहिती अधिकारात कळली. या रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले. मात्र हा रस्ता अर्धवट सोडून देण्यात आला. लवकरात लवकर सदर रस्त्याचे कामे मार्गी लावावे, रस्ता पुर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करु नये अशी मागणी गुंडला यांनी केली आहे. या रस्त्याचे काम सुरु न केल्यास येत्या पंधरा दिवसात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.