• Wed. Dec 11th, 2024

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कालमर्यादा वाढवून देण्याचे शिक्षण सचिवांकडून मान्य -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Jul 8, 2022

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण प्रधान सचिवांची मंत्रालयात भेट

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत माता पूजन व क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा परिषदेचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद शिष्टमंडळाने शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. त्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा प्रश्‍न उपस्थित केला असता, शालेय शिक्षण प्रधान सचिव देओल यांनी कालमर्यादा वाढवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, मुंबई कार्यवाहक शिवनाथ दराडे, रात्र शाळा संयोजक निरंजन गिरी, संतोष धावडे, ज्ञानेश्‍वर पवार आदी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन प्रामुख्याने वरिष्ठ व निवड श्रेणीचा मुद्दा उपस्थित केला. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे दैनंदिन अध्यापनातून तसेच सेतू अभ्यास, प्रशिक्षणच्या वेबसाइटसच्या अडचणी आदी कारणांमुळे प्रशिक्षण पूर्ण करण्यात उशीर होत आहे. त्यामुळे पुढील दोन महिने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण कालावधी वाढविण्याची मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली. ती मागणी शालेय शिक्षण प्रधान सचिवांनी तात्काळ मान्य केली.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा केला जाणार असून, यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत भारत माता पूजन व क्रांतिकारकांच्या जीवनपट/कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी जनजागरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी या राष्ट्रीय कार्यक्रमास शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावर शिक्षण प्रधान सचिवांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *