सात वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे वट पौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वडांचे रोपे लावण्यात आले. तर सात वर्षापूर्वी वट पौर्णिमेला लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सात हि जन्मात हाच पती मिळो यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधला जात असतांना, या उपक्रमातून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवनाथ विद्यालयाच्या परिसरात सुवर्णा जाधव, शुभांगी धामणे, प्रियंका डोंगरे-ठाणगे यांच्या हस्ते वडांची रोपे लावण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, तुकाराम खळदकर, मंदा साळवे, आशाबाई ठाणगे, निर्मला डोंगरे, कमल ठाणगे, मंदाताई डोंगरे, वनरक्षक अफसर पठाण, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, भानुदास लंगोटे, शांताबाई डोंगरे, जया डोंगरे आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, गाव हरित व सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी वृक्ष लागवड चळवळीत योगदान द्यावे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करुन, त्याचे संगोपन करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगून त्यांनी वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले. अफसर पठाण यांनी वडाला अधिक जागा लागत असल्याने शहरी भागात या वृक्षाची लागवड केली जात नाही. परंतु खुल्या जागेत रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लाऊन जगविणे गरजेचे आहे. पशु-पक्ष्यांचे निवारा या वृक्षावरती असतो. तसेच इतर सुक्ष्मजीवही या झाडांचा आधार घेत असतात दरवर्षी डोंगरे सामाजिक संस्थेच्या वतीने वट पौर्णिमेला वडाची झाडे लावून त्यांचे संवर्धनही केले जात असल्याचे त्यांनी कौतुक केले.
मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी वटवृक्षाचे प्रमाण दिवसंदिवस वृक्ष तोडीमुळे कमी होत असून, महिलांना गावोगावी वृक्षाचे झाड पूजेसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी शोधावी लागतात. मोठ्या शहरात तर या झाडांच्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करण्याची वेळ येते. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वडाच्या झाडांची संख्या वाढणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरणाचे सहकार्य लाभले.