पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकाराने समाजात जागृतीचे कार्य सुरु
अहमदनगर(प्रतिनिधी)- लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकार करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकार घेतला असून, याची समाजात जागृती करण्याचे कार्य सातत्याने सुरु असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
निसर्गाचे मूळ सूत्र म्हणजे मूलभूत सहयोग ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी मनापासून स्वीकारली आणि राबवली. त्याबाबतचे सर्वस्वी प्रशिक्षण त्यांना राजमाता जिजाऊने दिले होते. त्यामुळेच लोक कल्याण हेच मुख्य सूत्र महाराजांच्या कायदा आणि शासन व्यवस्थेमध्ये होते. लोककल्याणाच्या विरोधात कुरापती करणार्यांना महाराजांनीच डिच्चू काव्याने समाजापासून दूर केले. याबाबत जगभरातील समाजशास्त्रज्ञांनी आणि राज्यकर्त्यांनी आश्चर्याचा भाग म्हणून या अभ्यासाकडे लक्ष दिले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा प्रश्न, निसर्गाच्या मूलभूत सहयोग तंत्राच्या विरोधात माणूस गेला आणि त्याने निसर्गाचे शोषण केले. त्यामुळे जगभरातील व जैवविविधता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. माणसाला चांगल्या पद्धतीने जीवन जगायचे असल्यास निसर्ग संवर्धन, सजीवांना जगण्याची संधी, त्याच बरोबर इतर मानवांना देखील बरोबरीचा दर्जा आणि शोषणमुक्त समाज व शासन व्यवस्था असली पाहिजे. भारतात दिल्लीपासून गल्लीपर्यंत गुट्टलबाज सत्तापेंढारी यांचे राज्य आहे. त्यामुळे या देशातील गरिबी वाढली आहे. जातीय दंगली वाढत आहे. उन्नतचेतनेपासून लोक दूर जात आहे. यावर एकच मार्ग म्हणजे जय शिवाजी, जय डिच्चू कावा हे तंत्र असून, ते स्विकारण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हंटले आहे.
शोषण करणार्यांना समाज जीवनातून दूर करणे आणि सर्व माणसांनी मूलभूत सहयोग तंत्राचा वापर करून सर्वांची प्रगती करण्यासाठीचे तत्त्व स्वीकारून त्याला अंमलात आणले पाहिजे. गुट्टलबाज सत्तापेंढारी आपापसात आरोप-प्रत्यारोप करून जनतेची फसवणूक करित आहे. येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गुट्टलबाज सत्तापेंढार्यांविरुद्ध डिच्चू कावा वापरल्याशिवाय राहणार नाही. याच कारणासाठी संघटनेने हा कानमंत्र घराघरात नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मूलभूत सहयोगाच्या माध्यमातून ऑपरेशन पर्याय नक्कीच निर्माण करता येऊ शकणार आहे. त्यातूनच पंचाहत्तर वर्षापूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्याची फळे आज सर्वसामान्यांना मिळू शकणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या अभियानासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.